पिंपरी (Pclive7.com):- विद्यानगर परिसरात एका ८ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.

या घटनेबाबत आमदार गोरखे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार हा अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. शहरात अशा विकृत प्रवृत्ती डोके वर काढत असतील, तर त्यांना वेळेतच ठेचून काढणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास वेगाने सुरू केला असून आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीच्या विकृत कृत्याचा विचार करता, कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचेही गोरखे यांनी स्पष्ट केले.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यानगर परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, “पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील,” असे आश्वासन आमदार अमित गोरखे यांनी दिले.




















Join Our Whatsapp Group