पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील कुदळे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका मोराला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोराचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात फिरत असलेल्या एका मोराचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. कुत्र्यांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात मोर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मोराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेला मोर जवळील शेतातील विहिरीत पडला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत मोराला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जखमी मोराला पुढील उपचारासाठी वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरावर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या राष्ट्रीय पक्ष्याचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group