लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा शहराजवळ असलेल्या शिरोता डॅम परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (दि.१७ मे) रोजी सुट्टी असल्याने पर्यटनासाठी आलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील तरुण व तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. करण ज्ञानदेव ठोंबरे (वय २०, रा. बालाजीविहार, कोडोली, सातारा) आणि कु. आर्या सुशांत बंडावार (वय २०, मूळ रा. गोंदिया) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे असून दोघे विद्यार्थी असून पुणे परिसरात शिक्षण घेत होते.

याप्रकरणी सुसगाव (ता. मुळशी, जि. पुणे, मूळ रा. कोलबले, जवळ हॉटेल पाटीलवाडा, धुळे) येथे राहणारा आणि ISBM कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा मृत विद्यार्थ्यांचा मित्र कु. सुजल प्रकाश पवार (वय १९, व्यवसाय: शिक्षण) याने कामशेत पोलीस ठाण्यात अधिकृत खबर दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१७) सकाळी ७:०० वा. सुमारास सुजल हा त्याचा मित्र करण ठोंबरे, आर्या बंडावार, आस्था टेंबरे, सृष्टी गवाडे आणि ज्योत्सना शेळके अशा ६ जणांच्या ग्रुपसह राजमाची किल्ला येथे फिरण्यासाठी दोन दुचाकी आणि दोन स्कूटीवरून निघाले होते. राजमाची जवळ पोहोचल्यानंतर सर्वांच्या संमतीने गडावर न जाता ‘शिरोता डॅम’ येथे फिरण्याचा बेत ठरला.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण डॅमच्या बॅकवॉटर परिसरात पोहोचले आणि पाण्यात पाय सोडून गप्पा मारत बसले. दरम्यान पाण्याचे गाळ आणि गढूळ स्वरूप पाहून आर्या आणि ज्योत्सना या दोघी “येथे गढूळ पाणी आहे, आपण पुढे जाऊ” असे म्हणत पुढे गेल्या. काही वेळातच दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ज्योत्सनाचा “वाचवा… वाचवा…” असा ओरडण्याचा आवाज आला. हे पाहताच करण ठोंबरे तिला वाचवण्यासाठी धावला आणि त्याच्या पाठीमागे सुजल देखील पळाला.
ज्योत्सना ही पाण्यात बुडणाऱ्या आर्याला वाचवण्यासाठी हात ओढण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिचा हात पोहोचत नव्हता. तितक्यात करणने पाण्यात उडी मारली, मात्र करणला देखील पोहता येत नसल्याने आर्या व करण हे दोघेही पाण्यात बुडू लागले आणि स्वतःला वाचवण्यासाठी हातवारे करू लागले. सुजलनेही पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, तसेच तिथे आलेल्या इतर पर्यटकांनीही मदतीचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने आर्या आणि करण हे दोघेही खोल पाण्यात बुडाले.

यानंतर मित्रांनी तात्काळ ‘डायल १००’ वर कॉल करून पोलिसांची मदत मागवली. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस, ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपत्ती व्यवस्थापन टीम’ तसेच ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ यांचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून (ॲम्बुलन्स) त्यांना कामशेत येथील महावीर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच म्हणजेच दुपारी ०५:१५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना ‘मयत’ घोषित केले.
या मदतकार्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळाच्या जवानांसह (निलेश गराडे, महेश मसने, भास्कर माळी, अमोल सुतार, विनय सावंत, कुणाल कडू, गणेश गायकवाड, राजेंद्र कडू, कुंदन भोसले, सागर लोकरे, अनिश गराडे, अभिजित बोरकर, सतिष सगर, नितीन सांगडे, सुनील गायकवाड) उधेवाडी गावचे लक्ष्मण गायकवाड आणि DATA टीम डेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो. हवा. हिप्परकर यांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास तपासी अंमलदार पो. हवा. लबडे करत आहेत.




















Join Our Whatsapp Group