पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांना थेट जाब विचारल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे भोसरीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मंगला कदम या आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. “माजी आमदार विलास लांडे यांना पाडायसाठी मी १५ वर्षे तुमचे काम केले. मात्र, आता तुमचे नगरसेवक आमची मदत करत नाहीत,” असा थेट आरोप त्यांनी केला असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

यावेळी मंगला कदम यांनी आमदार लांडगे यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. या चर्चेदरम्यान उपस्थित काही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले होते. मात्र, व्हिडिओ शूटिंग सुरू असल्याचे लक्षात येताच आमदार महेश लांडगे यांनी मोबाईल बंद करण्यास सांगितल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महापालिका प्रभाग ११ चिखली घरकुल परिसरात महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पाणथळ जागा, धावण्यासाठीचा मार्ग (जॉगिंग ट्रॅक) आणि जुनी-नवी मिळून घनदाट वृक्षवल्ली आहे. या ठिकाणी विविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर असतो. स्पाइन रस्ता आणि प्रभाग १० मधील संभाजीनगरच्या मध्यभागी हा परिसर येतो. या जागेवर गेल्या पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मंगला कदम यांच्या पुढाकाराने जवळपास २५ गुंठे क्षेत्रावर धार्मिक स्थळ उभारण्याचे काम सुरू आहे. मंगला कदम यांचे सुपुत्र कुशाग्र कदम हे भाजपचे नगरसेवक आहेत.

मंगला कदम यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या कामाला आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक असलेल्या प्रभाग ११ मधील नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या परिसरातील धावण्याच्या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी नागरिक व्यायामासाठी माठ्या संख्येने येतात. तसेच, पोलीस दलात भरती होण्यासाठी पूर्वतयारी करणारे जवळपास ३०० तरुण दररोज येथे धावण्याचा सराव करतात. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर काम होऊ दिले जाणार नाही, असे नगरसेविका नागरगोजे यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपासून मंगला कदम आणि योगिता नागरगोजे यांच्यातील हा वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. शनिवारी नागरगोजे यांनी सुरू असलेल्या कामाला प्रत्यक्ष विरोध केला. त्यानंतर कदम यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून थेट आमदार महेश लांडगे यांना गाठले आणि जाब विचारला. आमदार लांडगे एका कामगार मेळाव्यासाठी या भागातील एका सभागृहात आले होते. कार्यक्रम संपवून ते परतत असताना कदम यांनी त्यांना रस्त्यात रोखले आणि तीव्र शब्दांत सुनावले.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर आमदार महेश लांडगे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.




















Join Our Whatsapp Group