पिंपरी (Pclive7.com):- पुणे विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत पिंपरीच्या साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला. पुणे डिस्ट्रिक्ट ॲमेट्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या मधुरा खांबे आणि समृद्धी भोईर यांनी दिवस गाजवला. मधुरा खांबे हिने लॉंग जंप आणि ट्रिपल जंप या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. तर समृद्धी भोईर हिने हॅप्टॅथलॉन प्रकारात सुवर्णपदक मिळवत अकॅडमीच्या यशात भर घातली.

याशिवाय अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या इतर जिल्ह्यातील खेळाडूंनीही आपल्या जिल्ह्यांतून राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. प्राची अंधारे हिची वॉकिंग स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातून निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातून आदित्य महाजन याची ट्रिपल जंप प्रकारात निवड झाली असून भावेश चौधरी आणि मयूर चौधरी या दोघांची वॉकिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकूण सहा खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा ३० मेपासून पुणे विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे.

या सर्व खेळाडूंचा पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी विशेष सन्मान केला. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक सुरेश भोईर, प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते. हे सर्व खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून साई स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नियमित सराव करत असून प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे आणि ज्युनिअर प्रशिक्षक ज्ञानेश्वरी कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना राज्यस्तरावर यश मिळत आहेत.




















Join Our Whatsapp Group