‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय भव्य निवासी प्रशिक्षण वर्ग लोणावळा येथे उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती बांधिलकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या महाअभियानात महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेत विविध १२ विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदविला.

प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या स्थापनेपासूनची माहिती देणारी भव्य प्रदर्शनीही उभारण्यात आली होती.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “शतप्रतिशत भाजपा” हा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले. देशात हजारो राजकीय पक्ष असले तरी केवळ भाजपामध्येच सातत्याने शाश्वत कार्य सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा सुवर्णकाळ सुरू असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना ‘हवेहवेसे’ वाटतील असे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सार्वजनिक जीवनात वावरताना पक्षाची प्रतिमा उंचावेल असे वर्तन ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पक्षशिस्त, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान यावर भर दिला. “पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक गल्लीमध्ये भाजपा दिसला पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनप्रसंगी आमदार चित्रा वाघ, रवींद्र अनासपुरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी व्यावहारिक कार्यपद्धती, वैचारिक अधिष्ठान, कार्य विस्तार, मीडिया व्यवस्थापन, कार्यपद्धती, देशासमोरील आव्हाने आणि कार्यकर्ता विकास या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी योगा व व्यायाम सत्राने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर बूथ व्यवस्थापन, भाजपा इतिहास, केंद्र सरकारच्या योजना, सोशल मीडिया, AI, नमो ॲप, सरल ॲप आणि विचार परिवार या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण वर्गाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे जिल्हा प्रमुख व संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी केले. त्यांना मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे आणि सचिन राऊत यांनी सहकार्य केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांना वैचारिक बळ मिळाले असून संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group