पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे आणि मिडिल ईस्टमधील वाढता लष्करी तणाव याचा थेट फटका आता भारतीय ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (दि.१९) मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लीटर सुमारे ९० पैशांची आणखी एक मोठी वाढ केली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हा एकाच आठवड्यात बसलेला दुसरा मोठा झटका आहे, कारण अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या शुक्रवारी (१५ मे) तेल कंपन्यांनी इंधन दरात तब्बल ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. या लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे देशातील नागरिक होरपळून निघाले असून बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दरवाढ म्हणजे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय आणि लष्करी संकटाचा थेट परिणाम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष तसेच ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ या सागरी व्यापारी मार्गावरील कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची निर्माण झालेली भीती यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेले आहेत.

यामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना दररोज मोठा तोटा सहन करावा लागत होता. गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या ३ रुपयांच्या दरवाढीमुळे कंपन्यांचा हा दैनंदिन तोटा जवळपास २५ टक्क्यांनी कमी झाला होता, परंतु मूळ खर्च आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यांमधील मोठी तूट भरून काढण्यासाठी कंपन्यांना ही नवीन दरवाढ करणे भाग पडले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नवे दर
पेट्रोल – १०७.९१ रूपये
डिझेल – ९४.४३ रूपये




















Join Our Whatsapp Group