पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईची गंभीर दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची उच्चस्तरीय बैठक घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने तसेच धरणांतील पाणीसाठा मर्यादित असल्याने शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रभाग २८ मधील अनेक सोसायट्या, गृहप्रकल्प आणि वस्त्यांमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारत परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्याचे निर्देश दिले.

बैठकीत बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “पावसाने ओढ दिली असली तरी नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही. प्रशासनाने योग्य नियोजन करून ज्या भागात गंभीर समस्या आहे तेथे पाण्याचा दाब वाढवावा. आवश्यकतेनुसार महापालिकेमार्फत मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा.” तसेच पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित करणे, कमी दाबाची समस्या दूर करणे आणि वितरण व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली.

लोकप्रतिनिधींच्या आक्रमक भूमिकेनंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभागातील जलवाहिन्यांची तपासणी करून दोष दूर करण्याचे आश्वासन दिले. अंतर्गत व्हॉल्व्ह यंत्रणेत आवश्यक बदल करून सर्व भागांना समान पाणीपुरवठा मिळेल यासाठी पुढील २४ तासांत नियोजन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा निरीक्षक तसेच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




















Join Our Whatsapp Group