पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलची UKस्थित T4 Education संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित World’s Best School Prizes 2026 मध्ये Innovation (नवोपक्रम) श्रेणीत जगातील Top 10 शाळांमध्ये निवड झाली आहे. सरकारी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वाचन संस्कृतीसाठी हा मोठा सन्मान मानला जात आहे.

शाळेने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांना आवडीची पुस्तके निवडण्याचे स्वातंत्र्य, समृद्ध ग्रंथालय आणि वाचन चळवळ समुदायापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांमुळे हा मान मिळाला.
गेल्या तीन वर्षांत ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या १,००० वरून ४,००० हून अधिक करण्यात आली. शाळेत दररोज वाचन तास सुरू करण्यात आला असून १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. शाळेचा वार्षिक साहित्य महोत्सव ‘कथाकार’ हजारो विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणत आहे.

‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेमुळे कासारवाडी परिसरात वाचन संस्कृतीला चालना मिळाली असून अनेक कुटुंबांनी घरगुती ग्रंथालये उभारण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या भागीदारीत विकसित झालेले हे वाचन मॉडेल आज ५० हून अधिक PCMC शाळांमध्ये राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत १.३८ लाख पुस्तके, ६७७ ग्रंथालय कपाटे, २० हजारांहून अधिक विद्यार्थी, ५०० शिक्षक आणि ५० मुख्याध्यापक या चळवळीशी जोडले गेले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक परिजात प्रकाश म्हणाले, “प्रत्येक मुलाला पुस्तकांवर प्रेम करण्याची संधी मिळावी, हा आमचा उद्देश होता. हा सन्मान विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण कासारवाडी समुदायाचा आहे.”
या यशानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे विशेष कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, आकांक्षा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ तनेजा तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक यशाचा उत्सव साजरा करण्यात आला.
सरकारी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाचन संस्कृती आणि समुदाय सहभागाला मिळालेली ही जागतिक मान्यता असून या यशामुळे पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने झळकले आहे.




















Join Our Whatsapp Group