पिंपरी (Pclive7.com):- चारित्र्याच्या संशयातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकण (ता. खेड) येथे उघडकीस आली आहे. मिक्सरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतः चाकण पोलीस ठाण्यात हजर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बडीमा रफिक पठाण (वय २७, रा. चाकण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेचे वडील मकबूल नदाफ (वय ५५, रा. चाकण) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय गवंडी, रा. चाकण) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक पठाण याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान अत्यंत भीषण घटनेत झाले. संतापाच्या भरात आरोपीने घरातील मिक्सरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी फरार न होता थेट चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गेला आणि आपण पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेमुळे चाकण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group