पुणे (Pclive7.com):- खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये पहिले मराठा जातीचे प्रमाणपत्र सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या तुषार राऊत या मराठा तरुणाला पहिले प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी पुणे – नाशिक महामार्गावर राजगुरुनगर व चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा होती. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी खेड तालुक्याचे मोठे योगदान आहे.
मराठा समाज आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असताना राज्य सरकारने याबाबत महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल विभागाने आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणी करून मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरण करण्यास सुरुवात केली आहे. खेड तहसीलदार कार्यालयातील सुविधा केंद्राच्या वतीने प्रस्ताव तयार करून ऑनलाईन पद्धतीने तहसीलदार, प्रांत कार्यालयीन पातळीवर कागदपत्राची छाननी केल्यानंतर प्रांताधिकारांच्या सहीने जातीचा दाखला दिला जात असल्याचे तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले. याप्रसंगी नायब तहसीलदार लतादेवी वाजे, नाना उगले यांच्यासह मंडल अधिकारी उपस्थित होते.