पिंपरी (Pclive7.com):- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी नऊ गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह संबंधित डीजे मालक आणि चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना आणि लेखी आदेशही देण्यात आले होते.

मात्र, २० सप्टेंबर रोजी सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सांगवी परिसरातील नऊ ते दहा गणेश मंडळांकडून उच्च क्षमतेचे डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सांगवी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक आणि चालकांविरोधात गुन्हे दाखल केले.

या कारवाईत पोलिसांनी ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली आणि स्पीकरसह १ डीजे सेट असा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर आणि कन्सोल जप्त करण्याची कारवाईही सातत्याने करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


















Join Our Whatsapp Group