पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदी पुन्हा एकदा फेसाळल्याचे चित्र समोर आले आहे. नदीपात्रात रसायनयुक्त तसेच मैलामिश्रित सांडपाणी थेट सोडले जात असल्याने चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर पांढरा फेस तयार झाला आहे. या प्रकारामुळे नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित व सांडपाण्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असून जलचर जीवसृष्टी धोक्यात आली आहे. नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पवना नदीवरील जलस्रोतांचा वापर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी होत असल्याने या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीतील फेस आणि प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मैलामिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांवर तसेच संबंधित घटकांवर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच नदी प्रदूषणाच्या स्रोतांचा शोध घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.



















Join Our Whatsapp Group