पिंपरी (Pclive7.com):- शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गौरी-गणपती उत्सवादरम्यान देवीच्या मूर्तीवर चढविलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक करून सुमारे 2 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर 2026 रोजी फिर्यादी यांनी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरात गौरी-गणपती उत्सवानिमित्त स्थापित केलेल्या एकविरा देवीच्या मूर्तीला घातलेले 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने घरातील व्यक्ती व कामगारांची चौकशी केली. तपासादरम्यान फिर्यादी यांच्या घरी काम करणारी गजरा सातप्पा कांबळे (वय 45, रा. आकुर्डी) हिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तिला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल असा एकूण 2 लाख 84 हजार 847 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे तसेच प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड आणि सागर कोळी यांच्या पथकाने केली आहे.

















Join Our Whatsapp Group