चाकणमधील आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत नागरी वसाहती, उद्योग, गोदामे आणि व्यावसायिक आस्थापनांचा वेगाने विस्तार होत असताना अग्निशमन केंद्रांची उपलब्धता आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा विभागनिहाय आढावा घ्यावा. मोईसह गरज असलेल्या भागांत नवीन अग्निशमन केंद्रे किंवा उपकेंद्रे उभारावीत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चाकण एमआयडीसीतील चिंबळी फाटा परिसरात ९ सप्टेंबर रोजी आर. आर. पॅकेजिंग कंपनीला लागलेल्या आगीचा परिणाम शेजारील कंपन्यांवरही झाला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी पीएमआरडीएसह पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगर परिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलांना संयुक्तपणे काम करावे लागले. अग्निशमन जवानांच्या कामाचे कौतुक करतानाच वाढत्या औद्योगिक विस्तारानुसार केंद्रे, साधनसामग्री आणि यंत्रणांमधील समन्वय मजबूत करणे गरजेचे असल्याचे लांडगे यांनी पत्रात म्हटले आहे.
कुदळवाडीतील अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर काही भंगार व्यावसायिक मोई व आसपासच्या भागात स्थलांतरित झाल्याचे निदर्शनास येत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. त्यामुळे भंगार साठवणूक, पत्राशेड आणि लगतच्या वस्तीची प्रत्यक्ष पाहणी करून आगीचा धोका तपासावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चाकण एमआयडीसीच्या हद्दीबाहेरील लहान उद्योग, कार्यशाळा आणि गोदामांसाठीही स्वतंत्र अग्निसुरक्षा नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यमान केंद्रांमधून घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ, रस्त्यांवरील अडथळे, पाण्याची उपलब्धता आणि भागनिहाय जोखीम यांचे सर्वेक्षण करावे. त्यानुसार नवीन केंद्रांसाठी जागा, निधी, प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहने आणि बचाव उपकरणे निश्चित करावीत, असे लांडगे यांनी सुचवले आहे.
पीएमआरडीए, एमआयडीसी, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठक घेऊन आपत्कालीन प्रतिसाद आराखडा तयार करावा व नियमित सरावाचे नियोजन करावे. प्रस्तावित अग्निशमन केंद्रांचा कालबद्ध आराखडा आणि सर्वेक्षणाचे निष्कर्ष लेखी स्वरूपात कळवावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“अग्निशमन जवान तत्परतेने काम करत आहेत. मात्र, वाढत्या वसाहती आणि उद्योगांपर्यंत मदत वेळेत पोहोचण्यासाठी जवळची केंद्रे, पुरेशी साधनसामग्री आणि सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. मोईसह जोखीम असलेल्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करून नवीन अग्निशमन केंद्रांचा कालबद्ध आराखडा निश्चित करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.