वाकड (Pclive7.com):- विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत वाकड परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने राहुल कलाटे फाउंडेशनच्यावतीने ‘ग्रीन‘ दत्त मंदिर रोड वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातून विशेष मागविण्यात आलेल्या सुमारे १०० बकुळ वृक्षांची लागवड दत्त मंदिर रोड परिसरात करण्यात येणार आहे. पुराणात आणि आयुर्वेदात या देशी वृक्षांचे महत्त्व असून पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने या परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल, या पर्यावरणपूरक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक राहुल कलाटे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, “दत्त मंदिर रोडचे काम ९०% पूर्ण झाले आहे. ‘ग्रीन दत्त मंदिर रोड’च्या माध्यमातून परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि प्रसन्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० बकुळ वृक्षांची लागवड करण्यात येत असून, या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावरही विशेष भर दिला जाईल. नागरिकांनी यात सहभागी व्हावे.”

२०२२ मध्ये दत्त मंदिर रोडच्या रुंदीकरण आणि सुशोभीकरणास सुरूवात करण्यात आली होती. आता पर्यावरणपूरक पद्धतीने हा रोड सज्ज होत असून, याबद्दल नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद व्यक्त करण्यात येत आहे.


















Join Our Whatsapp Group