पिंपरी (Pclive7.com):- प्रॉपर्टीच्या वादातून ८३ वर्षीय आजोबांनीच नातवाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागातून उघडकीस आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघात वाटलेले हे प्रकरण आता खुनामध्ये बदलले गेले आहे. रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून आजोबांनीच नातवाचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे.

अभय माणिक मराठे (वय ३३) असे मृत्युमुखी पाडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना लोणावळ्यातील भुशी गावातील हॉटेल “मोतीराम”च्या आवारात घडली. अभय मराठे हे लोणावळा शहराचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे सुपुत्र होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी घडला. आजोबांची रायफल साफ करताना अभय मराठे यांना गोळी लागली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झालेल्या मराठे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मृतदेहाचे शवविचेदन सुरू असताना पोलिसांना या प्रकरणाचा संशय आला. मृतदेहाची पाहणी करताना रायफल वरून गोळीबार झाला तर थेट पोटात छिद्र पडलं असं दिसलं आणि हा गोळीबार असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी तात्काळ हॉटेल मोतीराम येथील कार्यरत असलेल्या वेटर आणि इतर लोकांची चौकशी केल्यानंतर अभय मराठे यांचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचं स्पष्ट झालं. तपासादरम्यान, अभय यांचे आजोबा मोतीराम मराठे (वय ८३) यांनीच गोळीबार करून त्याचा खून केल्याचं समोर आलं.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम मराठे आणि त्यांचे नातू अभय मराठे यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद सुरू होता. ५ ऑक्टोबर रोजी सुद्धा त्यांच्यात एक व्यवहारातून वाद झाले. आजोबा मोतीराम यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या परवानाधारक रायफल मधून गोळीबार करून अभय यांच्या छातीत गोळी झाडली.
मराठे कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल..
अभय मराठे यांचे तीन भाऊ आहेत, मात्र त्यांचे आणि आजोबांशी वेगवेगळ्या कारणांमुळे आधीपासूनच पटत नव्हतं. कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांना या घटनेतून वाचवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न सुद्धा केला. गुन्ह्यांतर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तसेच आजोबा मोतीराम मराठे यांना वाचविले प्रकणारी कुटुंबातील आणखी ५ जणांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजोबांना होती शिकारीची “आवड”
मोतीराम मराठे यांच्याकडे एकूण २ रायफल होते. १९७० मध्ये त्यांनी एक १२ बोर चे रायफल खरेदी केले होते. तर दुसरे रायफल १९८० मध्ये खरेदी केले होते. मोतीराम मराठे यांना शिकारीची आवड असल्याने त्यांनी हे दोन्ही परवानाधारक रायफल खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी शिकारीसाठी त्यांनी या दोन्ही रायफलचा वापर केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. यातील एका रायफल मधूनच मोतीराम यांनी त्यांच्या नातवाचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



















Join Our Whatsapp Group