पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरवमध्ये मंदीराचे बांधकाम सुरु असताना सभामंडप कोसळून अपघात झाल्याची घटना दुपारी घडली. या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या महादेव मंदीराच्या जिर्णोध्दाराचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू होते. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मंदीरातील सभामंडपाचा स्लॅब अचानकपणे कोसळला. त्यावेळी १० ते १२ कामगार येथे काम करत होते. या स्लॅबखाली अनेक काम करणारे कामगार दबले गेले होते. परंतु स्थानिकांनी तात्काळ धाव घेत सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. सांगवी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका केली.