पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश, प्रसिध्द साहित्यकार बी.एस.कांबळे, मनिष गोयल (बांधकाम व्यावसायिक), उमेश टाक (बांधकाम व्यावसायिक) उपस्थित होते.
प्रसिध्द साहित्यकार बी.एस. कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “महाराष्ट्रात राहणारा तो मराठी माणूस आणि त्याची मातृभाषा मराठी. परंतु त्याची बोली त्यांच्या जन्मस्थान अथवा कर्मस्थाना वरून ठरत असते. पिंपरी चिंचवडचा अभ्यास केल्यास वेगवेगळ्या भागांची अनुभूती येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामधंदा, नोकरीनिमित्त आलेला माणूस येथे वास्तव्यास आहे. त्यांच्याशी बोलताना त्या त्या भागातील बोली ऐकायाला मिळते. त्यातील लय लकब दिसते व्यक्तीच्या बोलण्यावरुन तो कोणत्या भागातील आहे याची माहिती न विचारताही ऐकणाऱ्या व्यक्तीला होत असते. इतका प्रभाव बोलीचा दिसून येतो.”
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी कविता, मराठी गीत सादर केले. मराठी गौरवा निमित्ताने हस्ताक्षर स्पर्धा (३ री ते ५ वी), निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा (६ वी ते ९ वी) घेण्यात आली. आणि विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मराठी पुस्तके वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रियंका लाडे ह्यांनी सूत्रसंचालन व हेमा शेलार आभार मानले.