पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी येत्या १ मार्च रोजी मोफत जयपूर फूट (कृत्रिम हातपाय) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या गरजू दिव्यांगांनी लाभ घ्यावा. तसेच धडधाकट नागरिकांनी आपल्या आसपास राहणाऱ्या दिव्यांगांपर्यंत या शिबीराची माहिती पोहोचवावी आणि त्यांना मदत करून माणुसकी दाखवावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
येत्या १ मार्च रोजी पिंपळेगुरव येथील जगताप पाटील कॉम्प्लेक्समध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मोफत जयपूर फूट वाटप शिबीर होणार आहे. तसेच शिबीरात सहभागी होणाऱ्या दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन, पोलिओग्रस्त व इतर कारणांमुळे पाय कापलेल्या रुग्णांना या शिबीरात मोफत जयपूर फूटचे वाटप केले जाणार आहे. त्यांना कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त करून देण्याचा या शिबीराचा उद्देश आहे. कृत्रिम अवयव वापरण्यास अगदी सोपे असून या अवयवांच्या सहाय्याने रुग्णांना पूर्वीप्रमाणेच चालण्यासह दैनंदिन जीवनातील सर्व कामे करता येतात. जयपूर फूट बसविलेले दिव्यांग अगदी सायकल, रिक्षा चालविणे, अॅथेलेटीक्स खेळ व नृत्य यांसारख्या खेळामध्येही भाग घेऊ शकतात.
या शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. दिव्यांगांनी थेट शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड, पुणेसह महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या दिव्यांगांना या शिबीराचा लाभ घेता येणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या समाजात धडधाकट असलेल्या नागरिकांनी आपल्या आसपास राहणाऱ्या दिव्यांगांपर्यंत या शिबीराची माहिती पोहोचवावी. अधिक माहितीसाठी प्रभाग स्वीकृत सदस्य विनोद तापकीर (9822880397) यांच्यासह 8208487723, 7507411111 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावे, असे आवाहनही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group