पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने मिळकतकर आणि पाणीपट्टीचा झिजिया करवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. महापालिकेतील सुरू असणाऱ्या अनागोंदी व भ्रष्ट कारभार पारदर्शकपणे केला तर, ही करवाढ करण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्यामुळे प्रशासनाचा झिजिया मिळकतकर व पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव महासभेने फेटाळून लावावा. जर हा प्रस्ताव झिजिया करवाढीचा प्रस्ताव मंजुर केला तर या शहरातील कामगार व नागरीकांना एकत्रीत करून आंदोलन उभे करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात मारूती भापकर यांनी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती विलास मडेगिरी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने मिळकतकर आणि पाणीपट्टीचा झिजिया करवाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. मिळकतकरासाठी असणाऱ्या करयोग्य मुल्य वाढीचा विचार महापालिका करत आहे. २००७ पुर्वीच्या मालमत्तांना दुपट्टीने ते तीपट्टीने करवाढ करायची, ही करवाढ करयोग्य मुल्य पध्दत आणि भांडवली मुल्य पध्दत अशा दोन पध्दतीने सुचविण्यात आली आहे. १ एप्रिल २०२० रोजी नव्या कर रचनेनुसार मालमत्ता करांची आकारणी करण्यात येईल. आगामी आर्थिक वर्षात मालमत्ता करांपोटी ७५० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल ही अपेक्षा आहे.
तर महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी दरांमध्ये वाढीचा प्रस्ताव तयार केला असुन, त्याअंतर्गंत दरमहा सहा हजार लिटरपर्यंतचे पाणी मोफत दिले जाणार असुन, त्यापुढील पाणीवापराच्या दरामध्यें मोठ्या प्रमाणावर वाढ सुचविली आहे. निवासी वापरासाठीच्या प्रतिकुटुंब, प्रतिसदनिका दरमहा ६ ते १५ हजार लिटरसाठी आठ रूपये, १५ ते २० हजार लिटरपर्यंत ४० रूपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच २० हजार लिटरपुढील वापरासाठी शंभर रुपये आणि व्यापारी कारणासाठीचा दर ५५ रूपये निश्चित केला आहे. या माध्यमातुन महानगरपालिकेला ६०० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल ही अपेक्षा आहे.
आर्थिक मंदी, बंद पडणारे कारखाने त्यामुळे जाणारा रोजगार, प्रचंड महागाईमुळे औद्योगिक नगरीचे कामगार, सामान्य माणुस हवालदिल झालेला असून तो त्रस्त आहे. अशात झिजिया मिळकतकर व पाणीपट्टी वाढ ही या नगरीतल्या नागरीकांचे कंबरडे मोडणारी आहे. महापालिकेतील सुरू असणाऱ्या अनागोंदी व भ्रष्ट कारभार पारदर्शकपणे केला तर, ही करवाढ करण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्यामुळे प्रशासनाचा झिजिया मिळकतकर व पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळुन लावावा. जर हा प्रस्ताव झिजिया करवाढीचा प्रस्ताव मंजुर केला तर आम्हाला या शहरातील कामगार व नागरीकांना एकत्रीत करून आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा मारूती भापकर यांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group