पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनातील होणारी कपात रद्द करून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी ईमेल द्वारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेला असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुध्दा त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्य शासनामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत देखील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याकरिता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत आहेत.
मात्र असे असतांना राज्य शासनामार्फत माहे मार्च २०२० चे शासकीय कर्मचार्यांचे वेतनामध्ये कपात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय पिंपरी चिंचवड मनपाच्या कर्मचार्यांना लागू करतेवेळी त्यामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना वगळून लागू करणे आवश्यक होते. तथापि,माहे मार्च २०२०चे वेतनामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांचे वेतनामध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे. अशा संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीत दिवसरात्र जीव धोक्यात घालून काम करणार्या कर्मचार्यांचे देखील वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय हा वेदनादायी असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारा आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी त्यांचा जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे त्यांचे वेतनामध्ये होणारी कपात ही निश्चितच अन्यायकारक आहे. याउलट देशातील काही राज्यांनी अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्मचार्यांना जोखमीचे काम करित असल्याने वेताना व्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तरी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचार्यांना वेतन कपातीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामधून वगळण्यात येवून त्यांना मनपामार्फत विषेश प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जेणेकरून सदर कर्मचार्यांना कोरोना विरुध्द लढण्यासाठी अतिरिक्त पाठबळ मिळेल. तसेच माहे मार्च २०२०चे वेतनामधून कपात करण्यात आलेली रक्कम त्वरित अदा करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी संदीप वाघेरे यांनी केली आहे.