पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे या बंधूंनी आज (दि. १) महापालिकेत मारहाण आणि धक्काबुक्की केल्याची माहिती भाजपा गोटातून मिळत आहे. मारहाणीनंतर मडेगिरी हे रूग्णालयात ‘ॲडमिट’ झाले आहेत. दरम्यान राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले असून फक्त शाब्दिक बाचाबाची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर महापौर दालनासमोर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच स्थायी समिती अध्यक्षांचा अँन्टी चेंबर आहे. तिथे सांयकाळी सव्वा सहा वाजता हा प्रकार घडला. ऐकमेकांना जाब विचारण्यातून सुरवात झाली आणि वाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. आरडाओरड एकून काही पदाधिकारी, नगरसेवक मध्यस्थी कऱण्यासाठी धावत आले. या झटापटीत त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे.
या वादामागचे मूळ कारण भूसंपादनाचा विषय आहे. नऊ महिन्यांपासून भूसंपादनाचा मागील विषय स्थायी समितीत समोर प्रलंबित होता. विलास मडिगेरी समिती अध्यक्ष असताना हा विषय वारंवार तहकूब ठेवण्यात आला होता. खासगी वाटाघाटीने भूसंपादन करायचे, असा तो विषय होता. मडिगेरी यांनी त्याला विरोध केला आणि टीडीआर नुसार मोबदला देण्याचा आग्रह धरला होता. विकास आराखड्यातील आरक्षणांवर अशी शेकडो आरक्षणे मोबदल्याशिवाय पडून आहेत. गेली अनेक वर्षे ज्यांचे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही असे जमीन मालक त्रस्त होते. स्थानिक मंडळींचीही त्याबद्दल प्रचंड नाराजी होती. या भांडणामागचे मूळ कारण हेच असल्याचे काही नगरसेवकांनी खासगीत सांगितले.
दरम्यान, नगरसेवक मयूर कलाटे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महापालिकेतील सात हजार कामगारांच्या हिताची धन्वंतरी योजना मडिगेरी यांनी हाणून पाडली. शहरातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात आहेत, मात्र त्यांचा मोबदला मिळत नाही. त्यासाठी खासगी वाटाघाटीचा विषय मंजूर करावा,असा आमचा आग्रह होता. वारंवार सांगूनही ते कोणाचेच ऐकत नव्हते, उलट त्यांचे वर्तन अत्यंत उध्दट होते. त्यावरून आमच्यात बाचाबाची झाली.
नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले की, धनवंतीच्या विषयावरून महासभेत स्थायीवर गंभीर आरोप झाले. त्याबाबत मडेगिरी यांना विचारले असता अर्वाच्च भाषेत बोलत त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. आमच्यात बाचाबाची झाली. त्यांना कोणीही मारहाण केली नाही. याला राजकीय वळण दिले जात आहे. नगरसेवक विलास मडिगेरी यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.
दरम्यान या प्रकरणात मारहाण झाली असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. परंतू भाजपाकडून या प्रकरणात स्टंट केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.























Join Our Whatsapp Group