पिंपरी (Pclive7.com):- कोरोना या महामारीच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली जात आहे. ज्यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. त्यामुळे या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज (दि.२८) पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, महिला अध्यक्ष वैशालीताई काळभोर प्रवक्ते फजल शेख, व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विनोद कांबळे, महिला युवती अध्यक्ष वर्षा जगताप यांच्यासह कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टंसिंग चा नियमाप्रमाणे कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशात शंभर दिवस आहून अधिक लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेक कंपन्या व्यापारी सरकारी कार्यालय छोटे-मोठे व्यवसायिक यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था चालू राहिली पाहिजे कामगार व्यापारी उद्योजक व सर्वसामान्य नागरिक व त्यांचे कुटुंबीय जगले पाहिजेत याचा विचार करता काही कंपन्या दुकाने उद्योगांना शासनाकडून अटी शर्ती लावून परवानगी देण्यात आली . मात्र जून महिन्यात डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे याचा थेट परिणाम सर्वच घटकावर, विशेषतः दळणवळण आणि आयात निर्यातीवर होणार आहे. ट्रान्सपोर्ट च्या किमती वाढल्या तर सर्वच जीवनावश्यक गोष्टींच्या वस्तू वाढणार यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.























Join Our Whatsapp Group