पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा शिरकाव पिंपरी चिंचवड महापालिकेत सुध्दा झाला आहे. नगरसेवकांसोबत आता महापालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक विभागातील कर्मचारी वगळून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीत ५० टक्के सूट द्यावी. पालिका हद्दीबाहेरुन व कन्टेनमेंट झोनमधून येणा-या कर्मचाऱ्यांना देखील कामावर येण्याची सक्ती करू नये. ज्या विभागात कोरोना संशयित आढळतील अश्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना तपासणी करण्यात यावी. सर्व महापालिका कार्यालये निर्जंतुकीकरण (सॅनीटाईज) करण्यात यावेत. कर्मचारी कोरोनाबाधित किंवा संशयित आढळल्यास त्यांच्या उपचारार्थ व विलगीकरणासाठी महापालिकेचे जिजामाता रूग्णालय सर्व सुविधेसह राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी महापालिका कर्माचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
कर्मचारी महासंघाच्यावतीने आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या जागतिक महामारी घोषित केलेल्या महाभयंकर रोगाविरुद्ध लढणेकामी पिंपरी चिंचवड महानगपालिकेतील बहुतांश कर्मचारी कार्यरत आहेत. या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करताना कोरोनाचा प्रादुर्भाव कर्मचाऱ्यांना देखील होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी करसंकलन विभागीय कार्यालयातील काही कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. नुकतेच मुख्य कार्यालयातील स्थापत्य विभाग व वैद्यकीय विभागातील काही कर्मचारी देखील कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या भितीयुक्त वातावरणामुळे त्यांची मनस्थिती बिघडत चालली असून त्यामुळे त्याचा त्यांच्या कामकाजावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापी यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून अत्यावश्यक विभागातील कर्मचारी वगळून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना उपस्थितीत ५० टक्के सूट द्यावी. तसेच महापालिका हद्दीबाहेरुन व कन्टेनमेंट झोन मधून येणा-या कर्मचाऱ्यांना देखील कामावर येण्याची सक्ती करू नये. ज्या विभागात कोरोना संशयित आढळतील अश्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना तपासणी करण्यात यावी. व सर्व महापालिका कार्यालये निर्जंतुकीकरण (सॅनीटाईज) करण्यात यावीत. अश्या उपाय योजना तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच महापालिका कर्मचारी कोरोनाबाधित किंवा संशयित आढळल्यास त्यांच्या उपचारार्थ व विलगीकरनासाठी महापालिकेचे जिजामाता रूग्णालय, पिंपरी हे अद्यावत वैद्यकीय कोरोना तपासणी यंत्रणा व इतर सुविधेसह राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पुढील त्रासाला सामोरे जावे लागणार नाही अशी मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे.























Join Our Whatsapp Group