पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याची बहुचर्चित आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या ७४२ कोटी रुपयांच्या कंत्राटाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अखेर पूर्णविराम दिली आहे. आयुक्तांनी ही निविदा रद्द केली आहे.
या निविदेमध्ये सत्ताधारी भाजपसह विरोधकांचे हितसंबंध होते. त्यामुळे निविदा प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने होऊनही आयुक्त रद्द करत नव्हते. याबाबत मंत्रालयात जा, असे सांगत होते. पण, कायदा आणि कागदपत्रांमध्ये अडकल्याने त्यांच्यावर निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढाविली आहे. यामुळे सत्ताधा-यांना मोठा झटका बसला आहे. याबाबत भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी हरकत घेतली होती. निविदा कशी चुकीच्या पद्धतीने झाली आहे, याचे पुरावे दिल्याने दुस-या सुनावणीत आयुक्तांनी निविदा रद्द केली.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई, तसेच १ हजार ६७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत ८ वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सल्लागाराच्या शिफारशींमध्ये फेरबदल केले. निविदेमध्ये वारंवार बदल करण्यात आले. कोणतीही तातडीची बाब नसताना स्थायी समिती, महासभेने आयत्यावेळी या विषयाला मंजुरी दिली होती. या निविदेत सत्ताधारी भाजप, विरोधातील राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिका-यांचे हात गुंतले होते. त्यावर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. याला भाजप नगरसेविका सीमा सावळे यांनी हरकत घेतली होती.
निविदेमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असून पूर्ण अभ्यास न करताच निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे. ही निविदा रद्द करून सक्षम समिती व महापालिकेच्या मान्यते नंतर कायदेशीरपणे राबवावी, अशी मौलिक सुचानाही त्यांनी केली होती. बेकायदेशीर कामकाज रेटण्याचा प्रयत्न केल्यास नाइलाजास्तव आपल्या विरुद्ध व प्रस्तुत प्रकरणी तयार केलेल्या निविदा समिती विरुध्द न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या सर्व मुद्यांचा सखोल विचार करून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अखेर ही वादग्रस्त निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.























Join Our Whatsapp Group