पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईतील धारावीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावी. समाजात कोणतीही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यावर मदत करण्यासाठी सर्वात अग्रेसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतो. त्यामुळे शहरात ‘धारावी पॅटर्न’ राबवून कोरोना महामारी आटोक्यात आणावी अशी मागणी भाजपा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.
यासंदर्भात उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घ्यावा. कोरोनाच्या रुग्णांना लवकर शोधून काढण्यासाठी या भागात नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन सारो टेस्ट करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळजवळ ८०० स्वयंसेवक यांच्या मदतीने सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी धारावीतील कोरोना आटोक्यात आणला होता. धारावी पॅटर्नच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्येही नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणे, मोबाईल स्क्रिनिंग करणे, लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाईन सेंटरची अंमलबजावणी करणे, जर इमारतीत कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण इमारत सील करणे आदी उपाययोजना राबविल्या पाहिजेत. धारावीत सुरूवातीपासून या उपाययोजना अधिक प्रभावी असाव्यात यावर भर दिला होता. दाटीवाटीची झोपडपट्टी असल्याने येथे सुरक्षित वावर (फिजिकल डिस्टन्सिंग) किती अशक्य आहे याची जाणीव होती. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांची तपासणी करून संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची रूग्णालयात व्यवस्था करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.
धारावीत तपासण्या, चाचण्या, उपाययोजना नेमके कसे काय केले? अवाढव्य लोकसंख्येच्या परिसरात हे सर्व करताना अडचणी आल्या नाहीत का? मोठ्या प्रमाणात विलगीकरण केल्यामुळे सार्वजनिक उपचार, स्वच्छता व अत्यावश्यक गरजांसाठी खूप प्रयत्न करावे लागले असतील. या सर्व बाबींचा विचार करून पिंपरी चिंचवड शहरात स्वयंसेवक व प्रशासनाने एकत्र काम केले तर ‘कोरोनामुक्त’ शहराकडे वाटचाल करता येईल. म्हणूनच आयुक्तांनी ‘धारावी पॅटर्न’ची अंमलबजावणी शहरासाठी करावी अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group