पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात १४ जुलैपासून सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनचे पाच दिवस आज दि.१८ रोजी पूर्ण होत आहेत. प्रशासनाने यात आता शिथिलता आणली असून उद्या दि.१९ पासून २३ जुलैपर्यंत वेळेच्या निर्बंधांसह जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. संदर्भातील अधिकृत आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिला आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशात दि.१९ जुलै ते २३ जुलै याकाळात लॉकडाऊन शिथील करण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात आलेली आहे.
■ केवळ या दुकानांनाच २३ जुलैपर्यंत परवानगी
▪१. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील.
▪२. सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/मंडई /आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते आठवडी व दैनिक बाजार/फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांचे मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहील.
▪३. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनांक १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालु राहतील.
● परंतु लॉकडाऊन शिथील होताना दुकानांमध्ये/बाजारपेठेत होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता कोविड -१९ चे संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी फक्त दिनांक १९ जुलै रोजी वरील अनुक्रमांक १ ते ३ मधील सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालु राहतील. तसेच दिनांक २० जुलै ते २३ जुलै पर्यंत उपरोक्त अनुक्रमांक १ ते ३ मधील सर्व प्रकारचे व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी १२ वाजे पर्यंत चालु राहतील.
▪पेट्रोलपंप व गॅस पंप सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु राहतील. व ते केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील पुरवठा साखळीतील वाहने तसेच पासधारक वाहनांना इंधन पुरवठा करण्यात येईल.
■ या गोष्टी २३ जुलैपर्यंत बंदच राहणार
▪झोमॅटो, स्वीगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ.
▪केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना व सेवा संपूर्ण बंद राहतील.
▪खाजगी कार्यालये/आस्थापना संपूर्णतः बंद राहतील.
▪उपहारगृह, लॉज, हॉटेल सार्वजनिक ठिकाणी/ ररत्यावर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, जॉगिंग, शारीरिक व्यायाम करण्यास मनाई राहील.
▪मद्य विक्री बंद राहील.
उपरोक्त, आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द कोणतीही, व्यक्ती, संस्था, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ याची कलमे ५१ ते ६०च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास पात्र असतील असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.























Join Our Whatsapp Group