पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राजकारणात पुन्हा नव्याने एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण पार्थ पवार हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून चाचपणीही सुरू झाली आहे.
पार्थ पवार हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवड मतदारसंघातून उभे होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव केला होता. पार्थ यांचा हा पराभव राष्ट्रवादी आणि पवार घराण्यासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. मात्र आता पार्थ पवार पुन्हा एकदा नव्याने राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार यांनी पालखी प्रस्थानावेळी देहूत हजेरी लावली होती. माजी आमदार विलास लांडे यांच्या वडीलांच्या निधनानंतर त्यांची भेट घेऊन सांत्वन केले होते. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांची भेट पार्थ पवार यांनी घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची अचानक भेट घेऊन शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये पार्थ पवार यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना ७ वा वेतन लागू करण्याबाबत चर्चा केली. त्याच बरोबर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्या वॉर रूमलाही भेट दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासात वेग येण्यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार हे पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र पार्थ पवार यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.






















Join Our Whatsapp Group