पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) च्या चालकांच्या थकित वेतनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर माई ढोरे यांची भेट घेतली. यावेळी चालकांच्या तक्रारी, समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून याबाबत तोडगा काढण्यासाठी विनंती केली.
भोसरीतील ११० पीएमपीच्या चालकांना ४ महिन्यापासुनचा थकित वेतन मिळत नाही. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या आदेशानुसार मनसे कामगार सरचिटणीस सचिन गोळे व नगरसेवक सचिन चिखले, तसेच मनसे भोसरी मतदारसंघाचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर व महापौर माई ढोरे यांची भेट घेतली. यावेळी पीएमपी चालकांच्या वेतनाबाबत विविध तक्रारी समस्या बाबत आयुक्त व महापौर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. चालकांचा हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली.
त्यावर येत्या चार पाच दिवसात पीएमपीच्या व्यवस्थापनाशी बैठक लावुन ड्रायव्हर वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याचे मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group