पिंपरी (Pclive7.com):- चऱ्होली लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगर अनधिकृतपणे फोडून इमारतीचे बांधकाम सुरू केल्याप्रकरणी प्राईड बिल्डर्स एल एल पी विकासकाला २५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. हवेलीच्या तहसीलदार गिता गायकवाड यांनी याप्रकरणी कारवाई केली असल्याची माहिती पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे सभासद, छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी दिली आहे.
प्राईड वर्ल्ड सिटी नावाने चऱ्होली लोहगाव हद्दीमध्ये असणाऱ्या मोठ्या इमारत प्रकल्पामध्ये अनधिकृत पद्धतीने खंडोबामाळ डोंगर फोडण्याचे काम चालू आहे. हा डोंगर फोडून या ठिकाणी डोंगरा लगतच इमारत बांधण्यात येणार आहे.
या बाबतीत पुणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण सभासद छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी तक्रार केली होती. मुळात डोंगर फोडून कोणतेही विकास काम करता येत नाही. तरी देखील या विकसक हा डोंगर कोणत्या नियमानुसार फोडतो. संबंधित कुठल्याही प्रकारची काळजी न घेता हे काम चालू केलेले आहे. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकते. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी चालू आहे. या सर्व गोष्टी अनधिकृत आहेत, यासाठी या विकसकाने परवानगी इमारत पाया खोदण्यासाठी घेतली व भला मोठा डोंगर फोडत आहे. यापुर्वी माळीण गावची दुर्घटना घडली होती. अनेक नागरिक यात मृत्युमुखी पडली होते. माळीण गावची दुर्घटना ही डोंगर भुघसरण झाल्याने झाली होती. या विकसकाने डोंगराचा पाया खोदण्याचे काम केले असल्याने हा डोंगर देखील भुघसरण होऊन दुर्घटना घडु शकते.
या विकसकाने ज्या परवानगी घेतल्या त्या पाया खोदण्यासाठी घेतल्या परंतु डोंगर फोडत असल्याने आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम विभागाने या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे. बांधकाम विभागाने परवानगी दिलेल्या आहेत त्या देखील ताबडतोब रद्द केल्या पाहिजेत. पाया खोदण्यासाठी ४० दिवसात काम पूर्ण करावीत अशा पद्धतीचे नमूद केलेले आहे. मुदत संपली असताना सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे डोंगर फोडण्याचे काम आज देखील राजरोसपणे चालू आहे. याच ठिकाणी शेकडो झाडे या विकसकाने विना परवाना तोडली आहेत. आज देखील त्याठिकाणी खुप झाडे अर्धवट तुटलेली आहेत. ही झाडे डोंगर भागात असल्याने पक्षांचा वावर होता, घरटी होती ती देखील तोडल्या गेली आहेत. वृक्ष प्राधिकरण पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी कारवाई करवी, अन्यथा विकसक व महानगरपालिका यांच्या विरोधात हरित न्यायालयात तक्रार करणार असल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले. यावेळी छावा संघटनेचे युवक पुणे जिल्हाध्यक्ष अमोल विर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group