पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने सहा महिन्यांचा मिळकत कर माफ करण्याचा ठराव केला आहे. अंतिम मान्यतेसाठी तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यात लक्ष घालून या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोरोना साथीमुळे शहरातील लहान-मोठे सर्वच उद्योग लॉकडाऊन कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत.
शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने त्याचा लघुउद्योजकांसह कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या वर्गाला महापालिकेचा मिळकत कर भरणे अतिशय जिकीरीचे होत आहे.
त्या अनुषंगाने शहरवासियांना दिलासा देण्यासाठी महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मिळकत कर माफ करण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यात लक्ष घालून त्याला मान्यता मिळावी, अशी विनंती सुलभा उबाळे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group