पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम मी करणार आहे. महापालिकेत कोणी चुकीचे काम करत असेल त्यांना सोडणार नाही. मग ते आयुक्त असो किंवा सत्ताधारी भाजपचा कोणताही नेता कोणालाही चुकीचे काम करू देणार नसल्याचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्याकडून राजू मिसाळ यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ आदी उपस्थित होते.
राजू मिसाळ म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी नगरसेवक जावेद शेख यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र त्यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे या पदावर मला संधी देण्यात आली. मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून अजितदादांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. विरोधी पक्षनेता या पदाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपाच्या प्रत्येक चुकीच्या कामांविरोधात मी आवाज उठवणार आहे. सध्या कोरोनाचं मोठे संकट शहरावर आहे. त्यामुळे शहरातील सर्व कोविड सेंटरची सर्वप्रथम पाहणी करून त्यातील त्रुटी तसेच समस्या जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात आयुक्तांना सूचना करणार आहे.
पुढे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार हे माझे जुने मित्र आहेत. मात्र मैत्री आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्या मैत्रीचा महापालिकेतील राजकारणावर कसलाही परिणाम होणार नाही. जिथे आमदार महेश लांडगे चुकीचे काम करतील, तिथे नक्कीच मी त्यांच्या विरोधात आवाज उठणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कथित मूर्ती घोटाळ्याच्या आरोपामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. आम्ही सत्तेतून पायउतार झालो. मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपच्या प्रत्येक कामावर आमची करडी नजर असणार आहे. आयुक्तांना देखील कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करू देणार नाही. गरज पडल्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आयुक्तांसह भाजपच्या चुकीच्या कामाची तक्रार करू असेदेखील ते म्हणाले.
‘तेव्हा मला भाजपची ऑफर होती..’
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नगरसेवक, नेते भाजपात दाखल झाले. त्यावेळी मला देखील भाजपात येण्याची ऑफर होती. महापौरपद हे ओबीसी राखीव असल्यामुळे पहिला महापौर करू असे आश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र मी पक्षासोबत राहिलो. त्यामुळेच एकनिष्ठेचे ‘फळ’ विरोधी पक्षनेते पदाच्या माध्यमातून माझ्या पदरात पडले आहे.राजू मिसाळ (विरोधी पक्षनेता)























Join Our Whatsapp Group