मोफत फॅशन डिझाईनिंग व कुकिंग प्रशिक्षणाचे चिखली पाटीलनगरमध्ये उद्घाटन
चिखली (Pclive7.com):- महिला सबलीकरण या उपक्रमासाठी भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे, श्रीराम वरदायिनी सखी मंच तसेच सामाजिक कार्य़कर्ते विनायक आबा मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एक मधील महिलांसाठी मोफत फॅशन डिझायनिंग व कुकिंगचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (दि.२) भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिपाली धानोरकर, उपाध्यक्षा राजश्री मोरे, रंजना चिंचवडे, किवळे मंडल अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व श्रीराम वरदायिनी सखी मंचच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
प्रभाग एक मधील अनेक सोसायट्यांमधील शेकडो महिलांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला आहे. चिखली पाटीलनगरमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मोफत फॅशन डिझाईनिंग आणि कुकिंग प्रशिक्षणाचे सहभागी महिलांना प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने बॅचनुसार क्लासेस घेतले जाणार आहेत.
यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे म्हणाल्या, ज्या महिला चुल आणि मूल सांभाळत आहेत, त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांचे सबलीकरण आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होणार आहे. सोनम मोरे यांनी महिलांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबविला असून, या संधीचे सोनं महिला करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिसरातील अनेक महिलांच्या संपर्कात राहील्यानंतर आपल्याला समजले, प्रत्येक महिलेला स्वतः चे अस्तित्व तयार करायचे आहे. त्यासाठी त्यांना भक्कम व्यासपीठाची गरज होती. महिलांच्या सबलीकरणासाठी काहीतरी करावे या विचारातून त्यांच्यासाठी कुकिंग आणि मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण आयोजित केले. या प्रशिक्षणास प्रभाग एकमधील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती सोनम मोरे आणि विनायक आबा मोरे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group