पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे एकूण ७ हजार ३६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक विशेष महासभेत चर्चेअंती बुधवारी (दि.३१) मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुका अवघ्या ९ महिन्यांवर ठेपल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी अनेक कामे उपसूचनेद्वारे सुचविली होती. सुमारे दीडशे कोटींच्या २३६ ग्राह्य उपसूचनांसह अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तर, १३७ उपसूचना नामंजूर करण्यात आल्या आहेत.
महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेचे मूळ ५ हजार ५८८ कोटी रुपयांचे व केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२ कोटींच्या प्रशसनाच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने २४९ कोटी रुपयांची वाढ केली. या वाढीसह स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी मांडलेला एकूण ७ हजार ३६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी मंजूर करण्यात आले.
तत्पूर्वी अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान निधी व शहरातील कामांवरून नगरसेवकांनी ताशेरे ओढले होते. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूक असल्याने प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावणे, तसेच नवीन कामांची भर घालण्यासाठी नगरसेवक प्रयत्न करत आहेत.
सभेत सत्ताधारी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी विविध प्रकारच्या ३७३ उपसूचना २६ मार्च रोजी दिल्या होत्या. परंतु तपासणी अंती सुसंगत असलेल्या २३६ उपसूचना ग्राह्य झाल्या. तर, इतर नगरसेवकांच्या विसंगत असलेल्या १३७ उपसूचना सभेत नामंजूर करण्यात आल्या.
अखेर २३६ उपसूचनांसह सुमारे दीडशे कोटी रुपयांची वाढ करत हे अंदाजपत्रक मंजूर झाले. त्यासाठी नगरसेवकांनी मोठ्या प्रकल्पावरील बहुतांशी निधी प्रभागातील लहान-मोठ्या कामांवर वर्ग केला आहे.






















Join Our Whatsapp Group