पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला याचे गांभिर्य नाही. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, कोरोना रूग्णांसाठी अपूरे बेड, ऑक्सिजनची कमतरता आणि कोविड-१९ लसीचा अपुरा साठा होत आहे. कोरोनाच्या उपचारात सत्ताधारी भाजपाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख यांनी आज (दि.१०) पत्रकार परिषद घेतली.
महापालिकेकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कोरोना साथीच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन जीव वाचवणारे औषध आहे. शहर परिसरात दररोज तीन हजारच्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून, शहरातील जवळ जवळ सर्व रुग्णालये संपूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध न ठेवल्याने कोरोना बाधित गंभीर रुग्ण जीवाशी खेळत होते.
या परिस्थितीची दखल घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाविरोधात महानगरपालिकेच्या आवारात आंदोलन केले. आंदोलन चालू असताना महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी भांडार विभागाकडे ९०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. याचबरोबर बाहेरून वाढीव २०० रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिलेले आहेत, असे सांगितले. परंतु, हे चुकीचे आहे.
शहरभरात कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फिरत होते आणि आजही फिरत आहेत. खाजगी मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीत.
अश्या गंभीर परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारणा करत आहेत कि, कुठून तरी इंजेक्शन मिळवून द्या. राष्ट्रवादी युवक आणि वरिष्ठ नेत्यांना दररोज कमीत कमी ३० ते ४० फोन रेमडेसिवीर इंजेक्शन मागण्यासाठी येत आहेत.
शहरातील सत्ताधारी भाजपला जर शहरातील नागरिक जिवंत राहावे, याविषयी थोडीशी संवेदना असेल तर त्यांनी तत्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनचा महानगरपालिकेकडील साठा कागदपत्रासहित सार्वजनिक करावा. याचबरोबर दि.६ एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत महापालिकेने किती करोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळवून दिले याचा तपशील जाहीर करावा.
याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याच्याबाबत झालेल्या घोटाळ्याची महापालिका आयुक्त पातळीवर चौकशी केली जावी, अशी आमची मागणी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group