पिंपरी (Pclive7.com):- भोसरीतील वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्यांच्या चिमुरडीला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप 1’ या दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. वेदीकाला ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटीचे इंजेक्शन देणं आवश्यक होते. मंगळवारी (दि.१५) सकाळी अकरा वाजता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये वेदीकाला हे इंजेक्शन देण्यात आले. वन टाईम जिनथेरेपी असल्याने इंजेक्शनचा एकच डोस दिला जाणार आहे.
वेदीकाच्या उपचारासाठी तिच्या पालकांनी क्राऊड फंडीगच्या माध्यमातून पैसे उभारले. मंगळवारी १६ कोटींचे इंजेक्शन वेदिकाला दिल्यानंतर तिच्या पालकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी सर्वांचेच आभार मानलेत.
वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटीचे इंजेक्शन देणे गरजेचे होते. एका सामान्य कुटुंबातील वेदिकाचे आई वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी जीवाचे रान करून क्राऊड फंडीगच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी रुपये जमा केले.
‘ज्या दात्यांनी आपल्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला इंजेक्शन भेटले’ अशा भावना वेदिकाच्या पालकांनी व्यक्त केल्या.
या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालया बरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे. यासाठी सिने-अभिनेते निलेश दिवेकर अणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली, संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील केली. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुरवातीपासून इंजेक्शन मिळेपर्यंत मदत केल्याचे शिंदे कुटुंबीयांनी सांगितले.
वेदीकाला इंजेक्शन दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी, ‘कष्टाचं आज चीज झालं’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘परदेशातून हे इंजेक्शन आणतेवेळी त्या इंजेक्शनच्या मूळ किमतीवर ६ कोटींचा आयात शुल्क आकारण्यात आला. सौरभ शिंदे यांनी माजी आमदार विलास लांडे आणि संकेत भोंडवे यांच्या माध्यमातून आयात शुल्क माफी संदर्भात विनंती केली.
तत्पूर्वी संसदेच्या अधिवेशनात वेदिका शिंदे हिचा उल्लेख करत या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार करून व संपर्क साधून ६ कोटी रुपये आयात शुल्क माफीचा निर्णय मंजूर करून घेतला. निरंतर पाठपुराव्याला अखेर यश मिळाले अशी फेसबुक पोस्ट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिली आहे.





















Join Our Whatsapp Group