पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व रिक्षाचालक व शालेय वाहनचालकांना मला आमदार म्हणून मिळणाऱ्या मानधनातून एक गणवेश शिवून देणार असल्याची घोषणा आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (दि. १५) केली.
पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर व सारिका भंडलकर यांनी सामाजिक जाणिवेतून एक हात मदतीचा या भावनेतून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सुमारे दीडशे रिक्षाचालक व शालेय वाहनचालकांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यावेळी आमदार जगताप यांनी ही घोषणा केली.
यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, संस्थेचे बाबु गंगावणे, मयूर शेलार, संतोष जावणे, पंकज मानेकर, मंदार कुलकर्णी, विकास ढोरे, प्रकाश शिंदे, सागर नांगरे, बाळासाहेब रोकडे, नागेश घारे, हेमा गंगावणे आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “संपूर्ण वर्षभर शाळा व शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहनचालक बांधवांचा रोजगार बुडाला आहे. तसेच रिक्षाचालकांनाही आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने उपासमारीला सामोरे जावे लागले आहे. रिक्षाचालकांना शासनाने १५०० रुपये रुपये आर्थिक मदत जाहीर केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सामाजिक जबाबदारी ओळखून शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील रिक्षाचालक व शालेय वाहनचालकांना तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला.
स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत ठराव करूनही महापालिका आयुक्तांनी राजकीय भूमिकेतून आर्थिक दुर्बल घटकांना अनुदान देण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. याबाबत आगामी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. उपासमारीची वेळ आलेले शालेय वाहनचालक व रिक्षाचालकांना वात्सल्याचा घास योजनेअंतर्गत पिंपळेगुरवमधील सृष्टी चौकात प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या सेंटर किचनमधून जेवण देण्यात येईल. तसेच पूरक व्यवसायाकरिता पतसंस्था व सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा भंडलकर यांनी केले. सारिका भंडलकर यांनी आभार मानले.