पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका २०२२ मध्ये होत आहेत. येणा-या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज तेजाने फडकवण्यासाठी शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षश्रेष्ठींनी शहराच्या राजकारणात लक्ष केंद्रीत केले आहे.
महापालिका निवडणुकीची प्राथमिक तयारी करण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना देण्याकरिता पक्षाचे नेते तथा पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत येत्या शुक्रवारी (दि.९ जुलै) पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत. आकुर्डी येथील सीजन बँक्वेट हॉल, जेम्स क्रिस्टल, तिसरा मजला येथे हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत शहरातील पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेमध्ये तिन्ही विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 10.30 ते 11.30 पिंपरी विधानसभा, 11.30 ते 12.30 चिंचवड विधानसभा आणि 12.30 ते 1.30 भोसरी विधानसभा अशा विधानसभानिहाय बैठका होणार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, खासदार श्रीरंग बारणे, उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात शहरातील सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहायचे आहे. पिंपरी चिंचवडमधील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक, महिला संघटक, गटप्रमुख अशा सर्व पदाधिका-यांना राऊत साहेब मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती तळागाळात पोहोचविण्यासाठी कोणते कार्यक्रम आयोजित करायचे, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात राऊतसाहेब मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
येणा-या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वांची एकजूट करून एककलमी कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. मेळाव्यात नवीन पदाधिका-यांची निवड देखील केली जाणार आहे. त्याची अधिकृत घोषणा खासदार राऊत करणार आहेत.