पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चिखलीत उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठातील प्रवेश प्रक्रियेला येत्या १४ जुलै रोजी प्रारंभ होणार आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्गात प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक मॉडेलचा शुभारंभ २३ जुलै रोजी होणार आहे.
‘कोविड-19’ या विषाणूच्या संसर्गापायी सर्व वर्ग ऑनलाइन माध्यमातून सुरू होतील. पूर्व प्राथमिक वर्गासाठी वार्षिक शिक्षण शुल्क प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये असेल. मात्र शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा असेल, असे शैक्षणिक संचालक स्वाती मुळे यांनी सांगितले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या उद्घाटनाबाबत चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत संतपीठाच्या संचालक मंडळासमवेत बैठक झाली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी तथा सचिव ज्योत्स्ना शिंदे, संचालक प्रा. डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प. राजू महाराज ढोरे, शैक्षणिक संचालक स्वाती मुळे, सल्लागार प्रा. अभय टिळक, महापालिका मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे आदी उपस्थित होते. संतपीठाच्या दुस-या टप्प्यातील इमारतीचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले.
संतपीठाच्या इमारतीच्या रचनेमध्ये संतांच्या विचारांचे प्रतिबिंब असावे तसेच परिसरात वृक्षारोपण करावे असे महापालिका आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. संत विचारांमधून प्रसृत होणा-या उच्च अशा मानवी मुल्यांचे सिंचन संस्कारक्षम वयापासून होणे गरजेचे असल्यामुळे इंग्रजी माध्यमातून दिल्या जाणा-या औपचारिक शिक्षणाला मूल्यशिक्षणाची जोड देण्यासाठी संतपीठ प्रभावी माध्यम ठरेल असे आमदार महेश लांडगे म्हणाले.
प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, आधुनिकता आणि परंपरा यांचे संतुलन जीवनामध्ये साकारणारी निरामय शिक्षणपद्धती विकसित करण्याचा एक अनोखा उपक्रम जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठाच्या माध्यमातून टाळगाव-चिखली येथे साकारतो आहे. प्रचलीत औपचारिक शालेय शिक्षणाला पूरक अशा अध्ययन-अध्यापन प्रणालीचा अंतर्भाव असणा-या या शैक्षणिक प्रयोगाचा पहिला टप्पा जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्वरूपात सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षात प्रवर्तित केला जाणार आहे.
केंद्रीय माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन – सीबीएसई) अभ्यासक्रमाला मराठी सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक परंपरेचा मुख्य प्रवाह असणा-या भागवतधर्मी संतविचाराची जोड देत जबाबदार नागरिक निर्माण करणारे मूल्याधिष्ठित जीवनशिक्षण प्रदान करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलावहिला प्रयोग आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाची खास शाळा टाळगाव-चिखली येथे उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये सुरु करण्यात येत आहे.
मुल्य आणि परंपरा यांची तोंडओळख होण्याच्या दृष्टीने इंग्रजी मराठीसह संस्कृत भाषेचाही समावेश असेल. बालवाडी (नर्सरी) आणि कनिष्ठ व वरिष्ठ शिशुवर्ग (ज्यूनियर व सीनियर किंडरगार्टन) असे तीन वर्ग चालू शैक्षणिक वर्षात सुरू होतील. केंद्रीय माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या या प्रशालेमध्ये टप्प्याटप्प्याने पुढील इयत्ता चालू करण्यात येतील. या प्रशालेची योजना, अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती तसेच अध्ययन-अध्यापन प्रणाली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमांनुसार कार्यान्वित असेल.
सल्लागार प्रा. अभय टिळक म्हणाले, वैश्विक स्पर्धेमध्ये पाय रोवून उभे राहण्यासाठी उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण कौशल्यप्रधान आधुनिक शिक्षण येत्या पिढ्यांना मिळणे ही आजच्या युगाची निकड आहे. परंतु, त्याच वेळी अशा शिक्षणाला नीतीमत्ता, समता, बंधुता, दया, करूणा, प्रेम अशांसारख्या मूलभूत मानवी मूल्यांचे अस्तर जोडलेले असणेही तितकेच अनिवार्य बनलेले आहे. दृष्टीने, आधुनिक अभ्यासक्रमाला पूरक अशा मूल्यशिक्षणाची भक्कम जोड देण्यावर या शिक्षणप्रणालीचा मुख्य भर राहणार आहे. जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ या शैक्षणिक प्रयोगाचा जन्म याच संकल्पनेमधून झालेला आहे. संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे म्हणाले, संतविचारांचा अंतर्भाव असलेल्या मानवी मुल्यांचे स्वतंत्र अध्ययन या माध्यमातून केले जाणार आहे.
स्वाती मुळे म्हणाल्या, तज्ज्ञ शिक्षकांचा समूह, अत्याधुनिक अशी शैक्षणिक साधने व विद्यार्थीसन्मुख अध्ययनपद्धती यांचा समन्वय या शिक्षणप्रणालीमध्ये साधण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. शालापूर्व स्तरापासून ते थेट डॉक्टरेटच्या संशोधनापर्यंत अध्ययनाच्या दर्जेदार सुविधा एकाच व्यवस्थेंतर्गत उपलब्ध करून देणे हा जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ या अपूर्व अशा शैक्षणिक उपक्रमाचा आद्य हेतू आहे. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय हा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अगदी आरंभीचा टप्पा आहे.






















Join Our Whatsapp Group