भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरच्या साई चौक, जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते आज दि.५ रोजी सकाळी करण्यात आले. या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्याचे नियोजन केले होते. मात्र तत्पूर्वीच राष्ट्रवादीकडून या विकास कामाचे उद्घाटन झाले आहे.

प्रभाग २८ रहाटणी – पिंपळे सदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन आज (दि.०५) पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. येथे फित कापून हा रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे, सागर कोकणे, उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका सौ .शितलताई नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले. या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे. विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या ग्रेड सेपरेटरचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ग्रेड सेपरेटर आज साकारत आहे. म्हणूनच अजित पवारांच्या हस्ते या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी केली होती. मात्र सत्ताधारी भाजपकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन आज करण्याचे नियोजन केले होते. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला आहे.





















Join Our Whatsapp Group