पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका परिसरामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार रविवारी (दि.२७) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली.

महापालिका परिसरात १०२९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ६० वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २२० पर्यवेक्षक लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
शहरामध्ये एकूण १०२९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९१६ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३७ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७६ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचे आयोजन आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group