पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने मार्चअखेर कर वसुलीसाठी जोर लावला आहे. जप्तीकरिता थकबाकी असलेल्या ४४२ मालमत्तांचे नियोजन केले होते. त्यापैकी ३२९ मालमत्ता जप्त केल्या. त्यातील १९३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. जप्ती कारवाईतून १३ कोटी ८१ लाख ५० हजार ५३५ रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला. आतापर्यंत ७८ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या. तर ६० मालमत्तांचे नळकनेक्शन तोडले असून, अशा १३८ मालमत्ताधारकांवर कारवाई केल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली. अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. थकलेल्या कराचा भरणा न केलेल्या मालमत्ता सीलही केल्या जात आहेत. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची सुविधा दिली आहे. नागरिकांनी मालमत्तेच्या थकीत मूळ कराचा भरणा करावा. कराचा भरणा करून पाणीपुरवठा खंडित होणे, यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारती आणि जमिनींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. सध्या लाख ६९ हजार ६४५ मालमत्तांची नोंद आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ४७२ कोटी ३७ लाख मालमत्ता कर वसूल झाला आहे. कर आकारणी विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडून थकीत कर वसुलीची कारवाई सुरू आहे. कर संकलन विभागाकडून १६ विभागीय कार्यालयातील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना महापालिकेच्या जप्तीपूर्व नोटिसा दिल्या जात आहेत.






















Join Our Whatsapp Group