पिंपरी (Pclive7.com):- कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या कार्यालयावर नुकताच काही गुंडांकडून हल्ला झाला. यामधील मुख्य सूत्रधार शोधा. तसेच गुंडांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा. नखाते यांना पोलीस संरक्षण द्या, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पुरोगामी संघटना तसेच कष्टकरी कामगारांनी आंदोलन केले.

यावेळी स्वराज अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, बाराबलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे, जनवादी महिला संघटनेच्या अपर्णा दराडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास केंदळे, स्वप्नील जवळे, क्रांतीकुमार कडोलकर, इरफान चौधरी, राजू बिराजदार, अनिल बारवकर आदींसह शहरातील कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील २० पुरोगामी संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे पदाधिकारी, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, रिक्षाचालक यांच्यासह कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या कार्यालयात जाऊन हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस चव्हाण व भांदुर्गे यांनी हातोडी व कोयता लपविण्यास व सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यास गुन्हेगाराला मदत केली. पोलीस स्टेशन मधुन त्यांना विनाचौकशी सोडून दिले, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.
मानव कांबळे म्हणाले की, मागील सूत्रधार कोण आहे हे तपासले पाहिजे. निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करून घेत नाहीत. याच्यामागे सूत्रधार कोण आहे ? कोणाची आर्थिक देवाण-घेवाण आहे. याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. काशिनाथ नखाते हे 25 वर्षापासून कष्टकरी कामगारांसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहे. त्यांचे प्रामाणिकपणा मुळे काही गुंडाचा, हप्तेखोरांचे आणि काही पुढारपण करणा-यांची भावना दुखावण्याची दाट शक्यता आहे. याचा तपास पोलिसांनी घेतला पाहिजे, असे मानव कांबळे म्हणाले.
भापकर म्हणाले की, पोलिस व मनपाच्या चुकीच्या गोष्टीमुळे अशी गुन्हेगार व बेकायदेशीर हॉकर्स कडून हप्ता गोळा करणारी मंडळी निर्माण झाली आहेत. त्यानां वेळीच ठेचले पाहिजे.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अप्पर कामगार आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेऊन गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शोधा. नखाते यांना पोलिस संरक्षण द्या. गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.





















Join Our Whatsapp Group