पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) व महिलांच्या जागा तसेच, सर्वसाधारण गटातील महिलांच्या जागेची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. २९) चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्या त्रिसदस्यीय एकूण ४६ प्रभाग आहेत. त्यात एकूण १३९ जागा आहेत. त्यातील अनुसूचित जातीच्या (एससी) २२ आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) ३ जागा, असा एकूण २५ जा राखीव आहेत. त्यापैकी १३ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. चिंचचडच्या प्रा. मोरे प्रेक्षागृहात ३१ मे रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीतील वरील २५ जागा कायम ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित सर्वसाधारण गटातील ११४ जागांसाठी शुक्रवारी पुन्हा आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसह निवडणूक घेण्यास मान्यता दिल्याने ओबीसीचे आरक्षण काढण्यात येत आहे. एकूण २७ टक्के आरक्षणाप्रमाणे १३९ पैकी ३७ जागा ओबीसीसाठी आरक्षित असणार आहेत. ती संख्या राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे.
एकूण १३९ (महिला ७०)
विषम संख्या असताना महिलासाठी एक जागा अधिक दिली जाते. मात्र, सर्वसाधारण गटातील ७७ पैकी ३८ जागा महिलांना आणि ३९ जागा खुल्या ठेवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. सोडतीनंतर प्रारूप आरक्षण यादी दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ३०) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम आरक्षण यादी ५ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.
अशा आहेत जागा
एससी : २२ (११ महिला)
एसटी : ३ (३ महिला)
ओबीसी : ३७ (१९ महिला)
ओपन : ७७ (३८ महिला)
अशा काढणार चिठ्ठ्या
एकूण १३९ मधून शिल्लक असलेल्या ११४ जागांमधून प्रथम ओबीसीच्या ३७ चिट्ट्या काढल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यातून १९ जागा ओबीसी महिलांसाठी चिठ्ठ्या काढून राखीव केल्या जातील. त्यातील उर्वरित १८ जागा या ओबीसी सर्वसाधारण असतील. शिल्लक राहिलेल्या ७६ जागा या सर्वसाधारण खुल्या गटासाठी असतील. त्यातील ३८ जागेसाठी चिठ्ठ्या काढून सर्वसाधारण गटातील महिलांच्या जागा आरक्षित केल्या जातील. शिल्लक ३९ जागा या सर्वसाधारण गटातील असतील. चिठ्ठया महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढल्या जातील, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
Tags: ओबीसी आरक्षण सोडतचिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकाप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहमहापालिका निवडणुकशुक्रवारी





















Join Our Whatsapp Group