पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी महापालिकेच्याच उपायुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज (दि.१३) काढले आहेत.
विकास ढाकणे यांची १५ फेब्रुवारी २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ढाकणे यांची ओळख होती. राज्यात सत्तापालट होताच आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाली होती. तेव्हापासून ढाकणे यांच्या देखील बदलीची चर्चा सुरू होती.
दरम्यान आयुक्त पाटील यांच्या बदलीनंतर एका महिन्याच्या आत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे. त्यांच्याजागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. स्मिता झगडे या महापालिकेत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त होत्या.