पिंपरी (Pclive7.com):- पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पुणे रेल्वे विभागाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये फुकट्या प्रवाशांबरोबरच ८ हजार ५८९ जणांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ६९ हज़ार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०६ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे पुणे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group