पिंपरी (Pclive7.com):- केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट आणि सुलभ व्हावा यासाठीचे दाखले पिंपरी-चिंचवडकरांना एकाच छताखाली मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या (शुक्रवारी) विविध लाभांचे वाटप, दाखले नागरिकांना देण्यात येणार आहेत. तसेच निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


या उपक्रमात महापालिकेच्या समाज विकास विभागा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना, शिक्षण विभागामार्फत प्रथमच राबविण्यात येणाऱ्या डीबीटीचे पैसे 10 हजार विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. तहसील कार्यालयामार्फत विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. याचबरोबर विविध विभागातील लाभार्थ्याना लाभ देण्यात येणार आहे.
हे दाखले मिळणार विनामूल्य!
‘शासन आपल्या दारी’ उपक्रममाच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रेशनकार्ड, उत्पानाचे पत्र, रहिवासी दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सातबारा, 8-अ वाटप, जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमिसाईल), 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्व दाखला, आधार कार्ड नवीन दुरूस्ती व अपडेट करणे, मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढवणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, आर्थिकदृष्या दुर्बल घटक दाखला (खुल्या प्रवर्गाकरिता), नॉन क्रिमिलिअर / उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला एकाच छताखाली मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या दाखल्यांसाठी नागरिकांकडून कोणतेही शूल्क आकारले जाणार नाही.
निगडीतील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण
लिंगायत समाजाने निगडीत महात्मा बसवेश्वर महाराजांचा आकर्षक, सुबक असा पुतळा बसविला आहे. बारा फूट उंचीचा हा पुतळा असून ब्रॉन्झ धातूने बनवलेला आहे. ईस्टलिंग धारक असा हा पुतळा आहे. यासाठी 27 लाख रुपये खर्च आला आहे. महापालिकेने यासाठी जागा, सीमा भिंत, पुतळ्यासाठी चौथारा, सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था तसेच गार्डनचे काम करून दिले आहे. या पुतळ्याचे अनावरणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी होणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group