पिंपरी (Pclive7.com):- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील राजपूत समाज संघटनेने आज महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
राजपूत महामोर्चा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नीता परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राजपूत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नीता परदेशी म्हणाल्या, राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या १६ हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता. अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे. यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.