पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील नखाते वस्ती, सिंहगड कॉलनीमध्ये नोव्हेंबर – डिसेंबर २०२२ च्या कालावधीत या भागामधून जाणारा मोठा नाला दुरुस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने एका ठेकेदाराला काम दिले होते. त्यांनी ते काम सुरूही केले. स्लॅब व नाला तोडण्यात आला, नाल्याच्या आतील बाजूस सिमेंट प्लास्टर करण्यात आले. परंतु त्यानंतर गेल्या १० महिन्यापासून नाल्यावरील स्लॅप अद्यापही टाकण्यात आलेला नाही. या ठिकाणचे काम पूर्णपणे बंद आहे. स्थानिक नागरिकांनी ठेकेदार यांना अनेक वेळा कॉल केला. येतो..करतो.. असे बोलत उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याचे दिवस आहेत. दारामध्ये लहान मुलं खेळतात. पावसाळा चालू असल्यामुळे नाल्यात पडून लहान मुलं वाहून जाण्याची एखादी घटनाही घडू शकते. तसेच पाऊस थांबला की घाण गटरामध्ये थांबली जाते. त्या वासाचा त्रास व त्यामुळे मच्छर मोठ्या प्रमाणात होतात. डेंगू मलेरिया यासारख्या आजाराला, रोगाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
त्यातच आता डोळ्याच्या साथीने डोके वर काढले आहे. याही आजाराचा नागरिकांना त्रास होत आहे. लहान मुलं खेळताना गटारात पडू शकतात. या ठिकाणी लाईटचे खांब होते, ते सुद्धा ठेकेदाराने सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाच्या वेळी तोडून टाकले असून लाईटचे खांब नसल्यामुळे रात्रीच्यावेळी एखादा अपघात घडू शकतो.
तरी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकाराची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून कामे पूर्ण करावीत. अन्यथा येथील नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.